खोटे नगरजवळ खदानीत पडलेल्या हरीणाला वनविभागाने सुखरूप काढले

harin

जळगाव प्रतिनिधी । कुत्र्याच्या पासून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात भितीने पळत सुटलेले हरीण मंगळवारी दुपारी खोटेनगरात तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या 70 फुट खोल खदानीत पडल्याची घटना घडली. या हरीणाला जिल्हा आपत्ती निवारण विभाग, महापालिका अग्निशमन विभाग तसेच वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन तब्बल साडेतीन तासानंतर हरीणाला खदानीतून सुखरुप बाहेर काढले. वनविभागाने ताब्यात घेवून त्याला सुरक्षितरित्या उमाळा शिवारातील जंगलात सोडले आहेत.

पाण्याच्या शोधात हरिण वस्तीभागात म्हणजे जुन्या महामार्गालगत असलेल्या कृषि महाविद्यालय परिसरात हरिण आले. याठिकाणी त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले. भितीने हरिण गल्ल्यांमधून पळत सुटले. पळत असताना अचानक तालुका पोलीस ठाण्याजवळील खदानीत पडले. याबाबत माहिती नागरिकांनी नजीकच असलेल्या तालुका पोलीस ठाण्यात कळविली. पोलिसांनी तत्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी.रावल यांना प्रकार कळविला. त्यांनी त्यांच्या अखत्यारीत महापालिका अग्निशमन विभाग, तसेच वनविभागाच्या अधिकार्‍यांना घटना कळविली. काही वेळातच सर्व विभाग, कर्मचारी अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी शशीकांत बारी, अश्‍वजीत घरडे, प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे, रवी सपकाळे, तेजस जोशी हरिण बचाव मोहिमेला दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. वन्यजीव सदस्य योगेश गालफाडे, बबलू सोनवणे, निलेश ठाकूर, ईश्‍वर राजपूत हेही यावेळी मदतीसाठी धावून आले होते. आपतकालीन साहित्य शिडी, दोरखंड याव्दारे प्रकाश चव्हाण, देविदास सुरवाडे व अश्‍वजीत घरडे खदानीत उतरले व खदानीच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पोहचले. टेकडी 40 ते 50 फूट उंच होती. खाली हरिण होते. दोन कर्मचारी खाली उतरले. 3.38 वाजता कर्मचार्‍यांना हरिणाला दोर बांधण्यात यश आले. मात्र हरिण वरत खेचता येत नव्हते. यात दगडांमुळे हरिण बिचकत असल्याने अडचणी वाढत होत्या. यादरम्यान हरिणाने अनेकदा सुटण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला सुखरुप काढण्याच्या चंग बांधलेल्या कर्मचार्‍यांनी कुठलीही चूक केली नाही. टेकडीच्या दुसर्‍या बाजूला उभ्या असलेल्या वन्यजीव सदस्यांकडे हरिणाला बांधलेल्या दोराचे टोक लांबवून फेकण्यात आले. अशाप्रकारे तब्बल साडेतीन तासानंतर 4.17 वाजेच्या सुमारास हरिणाला सुखरुप बाहेर काढण्यात सर्वांना यश आले. सुखरुप बाहेर काढलेल्या हरिणाला वनविभागाच्या ताब्यात आले. वन अधिकारी जी.आर.बडगुजर व चालक योगेश पाटील यांनी ताब्यात घेवून वाहनातून त्याला उमाळा येथील जंगलात नेण्यात आले. याठिकाणी त्याला सोडण्यात आले.

Add Comment

Protected Content