शिवसेना व बाळासाहेबांचा फोटो काढून जगून दाखवा : ठाकरेंचे आव्हान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय नाही केले ? मुख्यमंत्र्यांकडे असणारी खाती त्यांना दिलीत, त्यांच्या मुलाला खासदार केले. आता ते काहीही म्हणत असले तरी त्यांनी शिवसेनेचे नाव व बाळासाहेबांचा फोटो काढून जगून दाखवावे असे आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज शिवसेना जिल्हाप्रमुखांशी बोलतांना त्यांनी आपण झुकणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करतांनाच सध्या सुरू असलेले राजकीय नाट्य हे भाजपनेच घडविल्याचाही स्पष्ट आरोप केला. ते म्हणाले की,   मी वर्षा सोडली म्हणजे मोह, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता.ते पुढे म्हणाले की, पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला.   शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली असे ते म्हणाले.

 

ठाकरे पुढे म्हणाले की, तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. शिवसेना चालवण्यासाठी नालायक आहे असं वाटत असेल तर मागचा फोटो काढून टाका आणि मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं विसरुन जा. शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. बाळासाहेबांसाठी माझ्यापेक्षा शिवसेना लाडकं अपत्य आहे, असंही ते म्हणाले.

Protected Content