
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मुंबईत प्रथमच शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शनिवारी सायंकाळी शक्तीप्रदर्शन होणार आहे.

दक्षिण मुंबई विभागाच्या वतीनं हा जाहीर मेळावा असून युवानेते आदित्य ठाकरे यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मरीन लाइन्स येथील बिरला मातोश्री सभागृह येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष शिवसेना पूर्णपणे पोखरली गेल्याने सध्या शिवसेनेची अवस्था खिळखिळी झाली आहे. शिवसेनेचे आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदेंच्या गटाची वाट धरली आहे. आता आगामी महानगर पालिका निवडणुकीत तरी शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी फुटू नयेत, या दृष्टीने शिवेसेनेच्या हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचा भव्य मेळावा उद्या आयोजित करण्यात आला आहे.


