जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वच्छता करणारे स्वच्छता मित्र हे खरे गावाचे नायक असून त्यांच्या कामगिरी मुळे गाव स्वच्छ राहते असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना.गुलाबराव पाटील यांनी केले पाळधी बु. येथे स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत जिल्ह्यस्तरीय कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रकल्प संचालक डॉ.सचिन पानझडे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सरपंच विजय पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की, आज देशात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली आहे स्वच्छता ही केवळ गरज नाही तर सवय झाली पाहिजे. गाव स्वच्छ ठेवले तर तालुका स्वच्छ होतो आणि तालुका स्वच्छ ठेवला की देश स्वच्छ होतो. याप्रसंगी स्वच्छता मित्रांचा सन्मान करण्यात आला व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते एक झाड आईच्या नावे हा उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले व उपस्थितांनी श्रमदानातून गावाची स्वच्छता केली. सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी तर आभार कैलास पाटील यांनी मानले.