माजी सैनिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथील माजी सैनिकाला मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी चोपडा तालुका आजी माजी सैनिक सेवा भावा संस्थेच्या वतीने सोमवारी ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास माजी सैनिक रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील रहिवाशी माजी सैनिक पंकज पाटील हे गणपती पुजेसाठी साहित्य व पुष्पहार खरेदी करण्यासाठी २ सप्टेंबर रोजी चोपडा शहरातील फुलांच्या दुकानासमोर दुचाकीने आले होते. त्यावेळी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी गाडी पार्कींगच्या क्षुल्लक कारणावरून माजी सैनिक पंकज पाटील यांना शिवीगाळ करून दुचाकीची चाबी काढून पोलीस ठाण्यात घेवून गेले. माझी चुकी नसतांना शिवीगाळ केल्याची जाब विचारला असता पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी माजी सैनिक पंकज पाटील यांना शिवीगाळ करून बेल्टने मारहाण केली. याप्रकरणाचा चोपडा तालुका आजी माजी सैनिक सेवा भावा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

या निवेदनावर प्रकाश माळी, कैलास बोरसे, गोपींचद पाटील, प्रकाश चौधरी, विठ्ठल चिंचोरे, वासुदेव काळे, रविंद्र शिंदे, शिवदास अहिरे, लखिचंद सोनवणे, रामकृष्ण सैदाणे, रमेश पाटील, ईश्वर बोरसे, देवीदास पाटील, साहेबराव पाटील, संग्राम कोळी, समाधान कोळी, जगन्नाथ पाटील यांच्यासह माजी सैनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1144059259797560

Protected Content