वेळोदे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

dead leopard

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वेळोदे शिवारातील विपीन वल्लभदास गुजराथी यांच्या मालकीच्या व साहेबराव केशव बागुल हे कराराने करत असलेल्या शेतात आज (दि.११) बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा मृत्यू विषबाधेने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, वेळोदे शिवारातील शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. सकाळी या शेतात कामाला असलेला बहादूर पावरा हा सकाळीं ११.०० वाजता कामावर गेला असता त्याला मेलेला बिबट्या दिसल्याने त्याने आपल्या मालकाला आणि पोलीस पाटीलांना त्याबद्दल माहिती दिली. त्यानुसार पोलीस पाटील मिलिंद अरुण करणकाळे यांनी पोलीस स्टेशन व वन विभागाला त्याची माहिती कळविली. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी तात्काळ हजर झाले, त्यात व्ही.एच. पवार, (सहा.वनरक्षक), पी.बी. पाटील (आर.एफ.ओ.), के.एल. धनगर (वनरक्षक),डी. बी.देवरे (वनरक्षक), पी.एस.सोनवणे (वनपाल), दीपिका पालवे (वनरक्षक), गोकुळ गोपाल (वनरक्षक), गोविंदा पाटील (ड्रायव्हर) तसेच जळगाव येथील वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई हे होते.
या बिबट्याने दोन दिवसांपूर्वी गावातील धर्मासिंग छोटू पावरा यांच्या गायीचा फडशा पडला होता, त्या गायीचे मांस दुसऱ्या दिवशीही ह्या बिबट्याने खाल्ले असावे आणि यातूनच त्याला विषबाधा होवून तो मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. कारण त्या गायीला मारल्या ठिकाणापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर तो मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याचा मृत्यू रात्री १२.०० नंतर झाला असण्याची शक्यता आहे. या बिबट्याचे वय सुमारे चार वर्षे असून अधिक माहिती पंचनाम्यानंतर स्पष्ट होईल, असे सहा.वनसंरक्षक पवार यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले. याप्रकरणी तीन डॉक्टरांच्या समितीचा अहवाल घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, येथे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक मोरणकर हे सुध्दा भेट देणार असल्याचे समजले.

Protected Content