ट्रेडर्स दुकान फोडणाऱ्या संशयिताला मुद्देमालासह अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंगमधील जय लहरी ट्रेडर्स दुकान फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तीन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी रविवारी ८ जानेवारी रेाजी दुपारी १२ वाजता भिलवाडी परिसरातून अटक केली आहे. यातील दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल आणि चोरी करतांना वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत नंदलाल रंगलानी (वय-५०) रा. साने गुरुजी कॉलनीच्या मागे, टेलीफोन नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग येथे जय लहरी ट्रेडर्स नावाचे शेतीला लागणारे इलेक्ट्रिक मोटार यांचे दुकान फोडून सुमारे ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. चोरी करतांना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. याप्रकरणी सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पवार यांच्याकडे देण्यात आला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोहेकॉ सलीम तडवी, गणेश पाटील, पो.ना. जुबेर तडवी, पो.कॉ. समाधानपाटील, पो.कॉ. अमित मराठे, नरेंद्र दिवेकर, केतन सुर्यवंशी अशांनी रविवारी ८ जानेवारी रोजी कारवाई करत दुपारी १२ वाजता संशयित आरोपी विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे रा. पावर हाऊस, भिलवाडी जळगाव याला त्याच्या राहत्या परिसरातून अटक केली आहे. इतर दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. चोरीला गेलेला ७३ हजार रूपयांचे मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १९ सीजी ६१०५) असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील करीत आहे.

Protected Content