नाकाबंदीत ४२ किलो गांजासह संशयित आरोपी अटकेत!

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।चाळीसगाव पोलिसांनी मालेगाव रोडवरील बायपास चौफुली येथे नाकाबंदी दरम्यान एका वाहनाची तपासणी करत तब्बल ४२ किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शेख नदीम शेख बशीर (वय ४०, रा. मालेगाव) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे २४ लाख ६९ हजार १५० रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजा वाहतुकीसाठी वापरलेली मारुती स्विफ्ट डिझायर गाडी देखील जप्त केली आहे.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी ३० एप्रिल रोजी पहाटे गस्त घालत असताना त्यांना धुळे-छत्रपती संभाजीनगर बायपास चौफुलीवर एका पांढऱ्या रंगाच्या गाडीच्या डिक्कीत निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजासदृश्य वास असलेला पदार्थ आढळला. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फॉरेन्सिक पथक आणि पंचांच्या समक्ष तपासणी केली असता तो अंमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपी शेख नदीम याला घटनास्थळीच ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आणखी काही आरोपींनी कन्नड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतही गांजा लपवून ठेवला होता. या माहितीच्या आधारे कन्नड पोलिसांनी छापा टाकून तेथून सुमारे ४५० किलो गांजा जप्त केला आहे. त्यांची किंमत जवळपासू १ कोटी २२ लाख रूपयांचा अंदाज असल्याचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, योगेश माळी, कैलास पाटील, अरुण बाविस्कर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content