श्रीनगर, वृत्तसंस्था | नियंत्रण रेषेजवळ नापाक कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने जोरदार दणका देत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. काश्मीरमधील तंगधारमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याने सुरुवातीला गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिले. चार ते पाच पाक सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केले तसेच अनेक पाकिस्तानी सैनिक जखमीही झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुरू असतानाच, लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डे उद्ध्वस्त केले. यात आतापर्यंत दहापेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केली जात असल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्येही रविवारी सकाळी सीमेपलीकडून काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने बेछुट गोळीबार केला. यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तसेच एका नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही धडक कारवाई केली. त्यात पाकिस्तानचे चार ते पाच सैनिकांना ठार करण्यात आले आहे, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. ही कारवाई सुरू असतानाच, घुसखोरीला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यातील दहशतवाद्यांचे चार ते पाच अड्डे उद्ध्वस्त केले. अड्ड्यांवर उखळी तोफांचा मारा केला. यात दहापेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळते.