पो.नि.शिनगारेंची समयसूचकता आणि सुरेशदादांच्या अटकेचा थरार !

d9f124bd f05b 4865 be0b de6a05677643

 

जळगाव (प्रतिनिधी) धुळे न्यायालयात न्या.सृष्टी नीलकंठ यांनी शनिवारी घरकुल घोटाळ्याचा निकाल देत प्रमुख आरोपी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना ७ वर्षाची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावला. या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. परंतू धरणगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक डी.एस.शिनगारे यांनी ‘त्या’ रात्री अगदी पाच मिनिटंही उशीर केला असता. तर जैन यांची अटक टळली असती. एवढेच नव्हे तर, अटकेनंतर दाखवलेल्या समयसूचकतेमुळे धरण्गावातील संभाव्य गोंधळही टाळण्यात पो.नि.शिनगारे यशस्वी झाले होते.

 

जळगाव महापालिकेच्या घरकुल योजनेत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन यांना १० मार्च २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. परंतू या अटकेचा थरार एखादं सिनेमासारखाच होता. १० मार्च २०१२ रोजी शिव जयंती होती. त्यामुळे धरणगावात मोठी मिरवणूक होती. सकाळपासून सर्वच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. रात्री साधारण १० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डी.एस.शिनगारे यांनी बंदोबस्तावरून परत आलेल्या कर्मचाऱ्यांना रिलीफ केले होते. शिनगारे हे आपल्या कक्षात जाऊन सुटकेचा श्वास घेणार तोच घरकुल घोटाळ्याचे तपासधिकारी तथा तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांचा फोन आला. सिंधू यांनी शिनगारेंना एक गाडी नंबर दिला आणि आदेश दिलेत की, ही गाडी धरणगावमार्गे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तत्काळ बॅरीकेट लावून चेकिंग सुरु करा.

 

पोलीस निरीक्षक डी.एस.शिनगारे हे एमआयडीसीला असतांना इशू सिंधू हे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे दोघांचे ट्युनिंग चांगले होते.पो.नि शिनगारे यांना सिंधू साहेबांच्या बोलण्यातील गांभीर्य कळाले होते. त्यानुसार त्यांनी पोलीस स्थानकात हजर एक-दोन कर्मचाऱ्यांना सोबत घेत स्वत:रस्त्यावर उतरले. त्यावेळी धरणगावात प्रवेश फक्त रेल्वे गेट ओलांडूनच करता येत होते. म्हणून मग पो.नि शिनगारे यांनी रेल्वे गेटच्या पलीकडे बॅरीकेट लावून वाहनांची तपासणी सुरु करत नाही,तोच समोरून सिंधू साहेबांनी दिलेल्या क्रमांकाची कार येतांना दिसली. पो.नि शिनगारे यांनी लागलीच समोरून येणाऱ्या कारला थांबण्याच्या सूचना केली. कार थांबताच काच खालिक करा म्हणून वाहन चालकाला सांगितले. काच उघडताच पो.नि शिनगारे हे उडालेच. कारण त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन हे एकटे बसलेले होते.

 

पो.नि शिनगारे यांनी तात्काळ सिंधू साहेबांना फोन केला आणि तुम्ही दिलेल्या नंबरच्या कारमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन हे बसलेले असल्याचे सांगितले. तिकडून सिंधू साहेबांनी लागलीच वेलडन शिनगारे म्हणत हमे यही चाहीए थे. तुम उन्हे धरणगाव पोलीस स्टेशन में लेकर जावो. पण या ठिकाणी देखील पो.नि शिनगारे यांनी समयसूचकता आणि अनुभवाच्या आधारे सिंधू साहेबांना सांगितले की, सर जैन यांना धरणगावात ठेऊ नका. कारण धरणगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमदार गुलाबराव पाटील हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे धरणगाव शहरात मोठा गोंधळ उडत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर सिंधू साहेबांनी तुम उन्हे लेकर जळगाव की और निकलो. मैं आगे बताता हुं.

दरम्यान, तेवढ्यात तत्कालीन एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी.गवारे हे देखील तेथे पोहोचलेले होते. त्यांनी येताच दादांना तुमची बंदूक कुठं आहे? माझ्याकडे जमा करा,असं सांगितले. त्यावर दादांनी बंदूक नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघं अधिकारी सुरेशदादा यांना घेऊन जळगावकडे रवाना झाली. याच दरम्यान, पो.नि.शिनगारे यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या की, जैन यांना ताब्यात घेतल्याची बातमी कुणालाही सांगू नये. कारण यामुळे गावातील शिवसैनिक आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक पत्रकारांना आपापल्या जळगाव कार्यालयातून फोन आल्यानंतरही स्पष्टपणे काही सांगता येत नव्हते. दुसरीकडे धरणगावातून जैन यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त खरे आहे का? असं राजकीय पदाधिकारी एकमेकांना विचारत होते. परंतू कुणालाही काही सांगता येत नव्हते. थोडक्यात शिवसेनेचा बालेकिल्ल्यातून शिवसेनेच्या नेत्याला अटक केल्यानंतरही कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला नाही.हे फक्त पो.नि.शिनगारे यांच्या समयसुचकतेमुळे शक्य झाले.

 

दरम्यान, पो.नि शिंनगारे यांनी अगदी पाच मिनिटंही उशीर केला असता. तर सुरेशदादा जैन हे धरणगावची हद्द पार करून निघून गेले असते. सुरेशदादांची गाडी धरणगाव सोडून निघाली असती. तर मात्र, पोलिसांना त्यांना शोधणे कठीण झाले असते. कारण धरणगाव सोडल्यानंतर दादा पारोळा गेले की, अमळनेर,चोपडा,शिरपूर हे कळायला मार्ग राहिला नसता. कदाचित अटकेआधीच सुरेशदादांना जामीन मिळणे सोपे गेले असते. परंतू पो.नि शिंनगारे यांनी समयसूचकता दाखवीत कर्तव्य निभावल्यामुळे घरकुल घोटाळ्याशी संबंधित एवढा मोठा निर्णय आपण अनुभवतोय. कदाचित दादांची अटक टळली तर या घटल्याचा निकाल काही वेगळा लागण्याची शक्यता होती.

 

या संदर्भात पोलीस निरीक्षक डी.एस. शिंनगारे यांची संपर्क साधला असता. इशू सिंधू साहेबांनी तपास केलेल्या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा होणे. ही तपास अधिकाऱ्यासाठी समाधान देणारी बाब आहे. पोलीस खात्यातील सेवेच्या दृष्टीने या खटल्यात छोट्या प्रमाणात का असेना…कर्तव्य निभावण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी दिली.

Protected Content