मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार हे आपल्या राजीमान्यावर ठाम असून सुप्रिया सुळे या पक्षाच्या आगामी अध्यक्षा असतील असे संकेत आता मिळाले आहेत.
काल यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आकस्मिकपणे राजीनाम्याची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी तेव्हाच करण्यात आली. यानंतर राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हीच मागणी केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांनी आज सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह गाठले. येथे राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांसह त्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या आगामी राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या तरी अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांची नावे या पदाच्या शर्यतीत आहेत. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.