कुराण मधून २६ श्‍लोक काढून टाकण्याची मागणी फेटाळली

नवी दिल्ली । मुस्लीम धर्मियांचा पवित्र ग्रंथ असणार्‍या कुराण शरीफ मधून २६ श्‍लोक (आयत) काढून टाकण्याची शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. यासोबत कोर्टाने रिझवींना ५० हजारांचा दंड देखील ठोठावला आहे.

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी २६ श्‍लोकांचा विशेष उल्लेख करताना सांगितले की यामुळे धर्मांधता आणि दहशतवाद वाढत आहे. ते म्हणाले की मूळ कुराणात याचा उल्लेख नसून ते नंतर जोडले गेले आहे. या अनुषंगाने त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. रिझवींच्या या मागणी नंतर मुस्लिम समाजात त्यांच्या विरूध्द मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता. ठिकठिकाणी निवेदनांच्या माध्यमातून रिझवींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

वसीम रिझवी म्हणाले की, कुराणचे हे श्‍लोक मदरशांमधील मुलांना शिकवले जात आहेत, ज्यामुळे त्यांचे मन कट्टरतावादाकडे वाटचाल करत आहे. कुराणातील या २६ श्‍लोकांमध्ये हिंसाचार शिकविला गेला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. दहशतवादाला चालना देणारे कोणतेही प्रशिक्षण थांबवले पाहिजे. या वचनांचा नंतर कुराणात समावेश केल्याचे रिझवी असेही म्हणतात. देशाच्या हिताच्या दृष्टीने हे श्‍लोक हटविण्याचे आदेश कोर्टाने द्यावे अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली होती.

दरम्यान, वसीम रिझवी यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली. कुराणच्या श्‍लोकांविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. यासह कोर्टानेही पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे.

वसीम रिझवी सध्या वाय श्रेणीच्या सुरक्षेत आहे. त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांची साथ सोडलेली असून रिझवीच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने याला जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न म्हटले आहे. बरेली येथे त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यांच्या आधीच ठिकठिकाणी निषेध करण्यात आला आहे.

Protected Content