नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नीट २०२४ च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालात झालेल्या हेराफेरीमुळे विद्यार्थी प्रचंड संतापले आहेत. आता नीट प्रवेश परीक्षेतील अनियमिततेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षा रद्द करण्याची आणि समुपदेशनावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या वृत्तानंतर उमेदवारांच्या एका गटाने नीट २०२४ परीक्षा नव्याने आयोजित करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अनियमिततेचा आरोप करत नीट २०२४ चा निकाल रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नीट परीक्षा ५ मे रोजी झाली होती आणि निकाल ४ जूनला लागला होता. दरम्यान नीटचा निकाल लागल्यापासून विविध राज्यांत विद्यार्थ्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. या प्रकरणाची पुढील तारीख न्यायालयाने अद्याप जाहीर केली नाही.