जळगाव प्रतिनिधी । बीएचआर प्रकरणात अटक करण्यात आलेले मुख्य संशयित सुनील झंवर हे सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असून कुणी नाही म्हणून दाखवावे ? असे प्रतिपादन आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले. जळगाव जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आज भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांसमवेत आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री आ. गिरीश महाजन बोलत होते.
यावेळी आ. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, प्रदेशा उपाध्यक्ष माजी आ. स्मिता वाघ, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, नारायण चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, राकेश पाटील, प्रल्हाद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, विशाल त्रिपाठी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, नगरसेवक भगत बालाणी, महेश जोशी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, अमित देशमुख, आनंद सपकाळे, राहूल वाघ, सचिन पानपाटील, गोपाळ भंगाळे, मिलींद चौधरी आदी उपस्थित होते.
माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की. जिल्ह्यातील शेतकर्यांची अतिशय भयंकर अवस्था असून आता दुष्काळाचे सावट आहे. यामुळे राज्य शासनाने जिल्ह्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग करावा, तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा केवळ २५ ते ३० टक्के पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊसच झालेला नसल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी.
जिल्ह्यात पावसाने हुलावणी दिल्यामुळे शेतातील पिके मरणावस्थेत पोहचली आहे. शेतकर्यांनी तिबार पेरणी केल्यामुळे पीक येण्याची शक्यता मावळली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व जलाशये कोरडी पडली असल्याने गुरांच्या चार्यासह पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी किंवा जिल्ह्यात कृत्रीम पाऊस पाडण्यात यावा. तसेच कुठल्या गावात पाणी टंचाई निर्माण होईल याबाबत सर्व्हे करुन तात्काळ उपायोजना करण्यात यावा. तसेच शासकीय यंत्रणेमार्फत सर्व्हे करुन दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.