मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेला सस्पेन्स गुरुवारी संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार जाणार आहेत. त्या आज उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? याची चर्चा सुरु होती. त्यानंतर हा सस्पेन्स संपला आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. सुनेत्रा पवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना संसदेत मागील दाराने पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छूक होते. त्यात छगन भुजबळ यांच्याबरोबर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी ही नावेही होती. परंतु सुनेत्रा पवार यांनी बाजी मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट नाराज झाला आहे. पक्षातील कार्यपद्धतीवर या गटाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. पक्षातील निर्णय सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफ्फुल पटेल हेच घेत असल्याचा आरोप केला जात आहे. पक्षातील निर्णय घेतांना इतरांशी सल्लामसलत होत नसल्याचा आरोप केला जात आहे. आधीच नाव निश्चित करायचे पण ऐनवेळी उमेदवारी घोषित करायची असेल तर काय अर्थ? असे या गटाकडून म्हटले जात आहे.