गो-तस्कर समजून शेतकऱ्यास गोरक्षकांकडून बेदम मारहाण

crime bedya

कोटा वृत्तसंस्था । गोतस्कर असल्याचे समजून शेतीसाठी गुरे नेणाऱ्या मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याला गोरक्षकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. गोतस्करी प्रकरणी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक गुरे वाहून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील राजगड येथे असलेल्या लक्ष्मीनारायण लोढा (४०), असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आपण आपल्या शेतीसाठी राजस्थानच्या बारा या शहरातून ही गुरे नेत होतो, असे लोढा यांनी सांगितले. मात्र, रस्त्यात गुरांची गाडी अडवून गोरक्षक दलाच्या सुमारे १२ कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार लोढा यांनी केली. या मारहाणीत लोढा जखमी झाले असून, या गोरक्षकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यास मात्र लोढा यांनी नकार दर्शवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गोरक्षकांच्या या कृत्याचा व्हिडिओही चित्रित करण्यात आला असून, यात गोरक्षक लोढा यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोरक्षक दलाचे प्रमुख अजय त्यागी यांच्या तक्रारीवरून लोढा यांना अटक करण्यात आल्याची माहिती सरथल पोलीस ठाण्याचे अंमलदार परमानंद मीना यांनी दिली. गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक गुरांचे वहन करण्यात आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे मीना यांनी सांगितले.

Protected Content