पश्चिम बंगालमध्ये निवडणूक बंदोबस्तासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाली असून शनिवारी सकाळी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या  १२ कंपन्या पोहोचल्या आहेत,

 

, येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत प. बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या एकूण १२५ कंपन्या दाखल होणार आहेत. प्रत्येक कंपनीत सहायक कमांडंटच्या नेतृत्वाखाली ८० ते १०० सुरक्षा जवान कार्यरत असतात.

 

सीएपीएफच्या दोन कंपन्या रेल्वेने दूर्गापूरला पोहोचल्या आहेत तर एक कंपनी वर्धमान येथे उतरली असून पाच कंपन्या हावडातील दानकुनी येथे पोहोचल्या आहेत, अन्य चार कंपन्या रेल्वने कोलकाता येथे पोहोचल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

जम्मू-काश्मीर येथूनही दलांना पाचारण करण्यात आले असून ते आपल्या नियोजित स्थळी रवाना झाले आहेत. रेल्वे स्थानकांवर या दलांचे सीआरपीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी स्वागत केले. निवडणूक आयोगाने २५ फेब्रुवारीपर्यंत राज्यात केंद्रीय दलांच्या १२५ कंपन्या तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

प. बंगालमध्ये केंद्रीय दलांच्या ज्या १२५ कंपन्या पाठविल्या जाणार आहेत, त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  ६०, सशस्त्र सीमा दलाच्या ३०,  सीमा सुरक्षा दलाच्या २५ कंपन्यांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या  पाच आणि इंडो-तिबेट पोलीस दलाच्या पाच कंपन्यांचा समावेश असेल.  प्रत्येक जिल्ह्यात ही केंद्रीय दले तैनात करण्याबाबतचा आराखडाही निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केला आहे.

 

अमली पदार्थप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भाजपच्या युवा नेत्या पामेला गोस्वामी यांनी पक्षातील सहकारी राकेश सिंह यांच्यावर कट रचल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची आणि तपास गुन्हा अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी शनिवारी केली.

 

गोस्वामी या भाजयुमोच्या राज्य सचिव असून त्यांना त्यांचा मित्र प्रदीपकुमार डे आणि त्यांच्या (पामेला) खासगी सुरक्षा रक्षकासह अलिपोर परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली, पामेला यांच्या पर्समध्ये आणि गाडीत ९० ग्रॅम कोकेन सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

 

गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी झाली पाहिजे, भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांचा सहकारी राकेश सिंह यांना अटक करण्यात यावी, हा कट रचण्यात आला आहे, असे गोस्वामी यांनी येथे सांगितले. एक वर्षापासून आपण गोस्वामी यांना भेटलेलो नाही, आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे राकेश सिंह यांनी म्हटले आहे.

 

पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  आसाममधील सीलापाथर येथे आयोजित कार्यक्रमात मोदी तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्प देशाला समर्पित करतील.  एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रेल्वेच्या अनेक प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Protected Content