
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजामध्ये आध्यात्मिक गोडी निर्माण व्हावी, सकारात्मक विचारांना चालना मिळावी आणि संघटनात्मक बांधणी अधिक बळकट व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विशेष ‘सुंदरकांड’ पठणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार आणि धर्मप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरण, गगनभेदी जयघोष आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

कार्यक्रमाची सुरुवात उपजिल्हाध्यक्ष नागराजभाऊ महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वामी विवेकानंद, चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरपूर्वक मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मसंरक्षणाचा संदेश देत महापुरुषांच्या कार्याला अभिवादन केले.
सुंदरकांड पठणाच्या मुख्य सत्रात राष्ट्रीय हिंदू संघटनच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. दिपाली तापडिया यांनी आपल्या मधुर आणि प्रभावी वाणीतून सुंदरकांडाचे सुश्राव्य पठण केले. त्यांच्या पठणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. महिला उपाध्यक्ष सौ. नीलकमल टाक यांनी त्यांना सुरेख साथ देत कार्यक्रमाचे प्रभावी समन्वयन केले. यावेळी सौ. किरण शर्मा यांच्या आवाजानेही कार्यक्रमात अधिक भक्तिमय रंग भरला.
संगीताच्या माध्यमातून या आध्यात्मिक कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. श्री. मेघराज सोनी यांच्यासह दृष्टीहीन असूनही तबल्यावर विलक्षण प्रभुत्व असलेले मनोहरजी सूरदास यांच्या तबलावादनाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. भक्ती, संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थित नागरिक भारावून गेले. व्यासपीठावरील सर्व कलावंतांचा जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ आणि सौ. कल्पना वाघ यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमातील स्वागत सत्रात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुरेश वाघ यांनी उपजिल्हाध्यक्ष नागराज महाजन आणि महासचिव योगेश बाविस्कर यांचा सत्कार केला. यानंतर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देणारे लाईव्ह ट्रेंड्स मीडियाचे पत्रकार प्रवीण पाटील, पत्रकार डॉ. विनोद पवार आणि युवा स्वराजचे पत्रकार कल्पेश वाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे कार्यक्रमात सामाजिक योगदानाचा संदेशही अधोरेखित झाला.
राष्ट्रीय हिंदू संघटनच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. संघटनेचे उपाध्यक्ष, महामंत्री, सचिव, युवा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला युवा अध्यक्ष रत्ना अत्तरदे, उपाध्यक्ष विद्या राजपूत, युवा महासचिव कु. मनीषा हटकर आणि सौ. कविता बेलदार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय हिंदू संघटनची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर “हिंदू राष्ट्राचा विजय असो”, “वंदे मातरम”, “जय जय श्रीराम”, “धर्म की जय हो, अधर्म का नाश हो” आणि “हम हिंदू सब एक रहेंगे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांच्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाला.



