भुसावळच्या तरूणाचा डंका : युपीएससीत उत्तीर्ण होऊन वन अधिकारीपदी निवड | Sumedh Sanjay Surwade-Bhusawal clears UPSC; Selected as forest officer

भुसावळ- इकबाल खान | शहरातल्या गडकरी नगरातील निवासी सुमेध संजय सुरवाडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वन अधिकारीपदी निवड झाली आहे.

भुसावळ शहरातील गडकरी नगरामध्ये संजय सुरवाडे हे सेवानिवृत्त शिक्षक वास्तव्यास आहेत. त्यांचा सुपुत्र सुमेध ( Sumedh Sanjay Surwade-Bhusawal ) याने वन अधिकार्‍यांसाठी घेण्यात आलेल्या युपीएससीच्या ( UPSC-2023 ) परिक्षेत संपूर्ण देशातून १३७ वी रँक मिळवत यश संपादन केले आहे. अर्थात, यामुळे त्याची वन अधिकारीपदी निवड झाली आहे. काल दुपारी या परिक्षेचा निकाल जाहीर होताच परिसरातील नागरिकांसह आप्तजनांनी आनंदोत्सव साजरा केला.

सुमेध संजय सुरवाडे याचे यश हे अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. त्याने जळगावातील शासकीय अभियांत्रीकीतून इंजिनिअरिंगमधील पदवी संपादन केल्यानंतर जळगावातील खासगी कंपनीत रूजू होत आपल्या करियरची सुरूवात केली. मात्र आधीपासूनच स्पर्धा परिक्षेचे क्षेत्र खुणावत असल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळी युपीएससी परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. यातच गडकरी नगरातील रहिवासी तथा स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ख्यात असलेले प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

हे देखील वाचा : भुसावळच्या कांतीलाल पाटील यांचे युपीएससीत यश

प्रा. लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनानेन सुमेध याने युनिक अकॅडमीचे प्रमुख तुकाराम जाधव यांच्याकडे जाऊन त्याने अभ्यास सुरू केला. गेल्या चार वर्षांपासून तो अव्याहतपणे अभ्यास करत असतांनाही त्याला अपयश आले. गेल्या वर्षी दिलेल्या नागरी सेवा परिक्षेसह आयएफओ या युपीएससीच्या दोन्ही परिक्षांची पूर्व परिक्षा त्याने क्वॉलीफाय केली. काही दिवसांपूर्वी लागलेल्या सिव्हील सर्व्हीसेसच्या निकालात त्याची निवड झाली नाही. तथापि, १ जुलै रोजी वन अधिकार्‍यांसाठीच्या परिक्षेत त्याला यश मिळाले असून ऑल इंडियात त्याला १३७ व्या क्रमांकाची रँक मिळाली आहे. यामुळे लवकरच तो केंद्र सरकारच्या सेवेत वन अधिकारी म्हणून रूजू होणार आहे.

अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सुमेध संजय सुरवाडे याने युपीएससी सारख्या अतिशय कठीण मानल्या जाणार्‍या स्पर्धेत यश मिळवून आपल्या कुटुंबासह भुसावळ शहराचा नावलौकीक उंचावला आहे. त्याच्या माध्यमातून परिसरातील तरूणांना स्पर्धा परिक्षेसाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे.

सध्या सुमेध सुरवाडे हा पुणे येथे असून लवकरच तो भुसावळ येथे येणार आहे. याप्रसंगी त्याचे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सुमेध संजय सुरवाडे याच्या यशाबाबत आनंद व्यक्त करत त्याची निवड ही अतिशय प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले आहे.

Protected Content