लॉस एंजेलिस, वृत्तसंस्था | इराकमध्ये मारला गेलेला इराणचा मेजर जनरल कासिम सुलेमानी याने दिल्ली हल्ल्याचाही कट रचला होता, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. सुलेमानीने निरपराध लोकांची हत्या केली. त्याने दिल्ली आणि लंडनवरील हल्ल्याचा कटही रचला होता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सुलेमानीला ड्रोन हल्ल्यात मारण्याचे आदेश दिले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुलेमानीच्या अत्याचारामुळे अनेक लोकांना यातना सहन कारव्या लागल्या. सुलेमानीला मारल्यानंतर आम्हाला प्रथम या लोकांचे स्मरण झाले. तो मारला गेला. त्याचा दहशतवाद संपुष्टात आला. याचे आम्हाला समाधान वाटते, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी त्यांनी सुलेमानी भारतात कधी, केव्हा आणि कशा प्रकारचा हल्ला करणार होता ? याबाबत अधिक खुलासा केला नाही. सुलेमानी अमेरिकेतील राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट रचत होता. याच कारणामुळे त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणने जर आमच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते थोपवण्याची आमची तयारी असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
‘सुलेमानीला आधीच मारायला हवा होता’
दरम्यान, २०१२मध्ये भारतातील इस्रायलच्या राजदूताच्या पत्नीवर कार बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला होता. त्याचाच ट्रम्प यांनी उल्लेख केला असावा, असा कयास वर्तवला जात आहे. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी कारमध्ये चुंबकाच्या मदतीने बॉम्ब लावून स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात ताल येहोशुआ कोरेन जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सर्जरीही करण्यात आली होती. त्याशिवाय त्यांचा चालक आणि कार शेजारी उभे असलेले दोन लोकही या स्फोटात जखमी झाले होते. या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला होता. याच तंत्राचा वापर करून जॉर्जियामध्येही हल्ला घडवून आणण्यात आला होता. त्यामुळे ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याला महत्त्व आले आहे