सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

मुंबई (प्रतिनिधी) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

 

प्रवेशासाठी आज सकाळीच सुजय विखे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले होते. पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डीलेही यावेळी उपस्थित होते. सुजय विखे पाटील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी इच्छूक आहेत. मात्र ती जागा राष्ट्रावादी काँग्रेसकडे गेल्याने सुजय विखेंनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट आणि शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

 

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे अहमदनगरची जागा सोडण्याबाबत विनंती केली होती. एवढेच नव्हे तर, जागेचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मध्यस्थी करणार असल्याचीही माहिती होती. मात्र शेवटपर्यंत जागेचा तिढा न सुटल्याने सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. यावेळी नगर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

Add Comment

Protected Content