जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील पहूर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत असणार्या गावात एका अल्पवयीन युगलाने आत्महत्या केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पहूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या एका गावामध्ये अल्पवयीन मुला मुली मध्ये प्रेम प्रकरण चालू होते. हे घरच्यांना मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणत असल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती. दरम्यान, त्यामुळे दिनांक आठ रोजी अल्पवयीन मुलीने विष प्राशन करुन आत्महत्या केली. याबाबत कोणालाही कानोकान खबर न लागता रात्रीच या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, याबाबत प्रेमी मुलाला ही माहिती मिळताच तो घरून बेपत्ता झाला होता. त्याने काल रात्री शेतामध्ये विषप्राशन करुन आत्महत्या केली. या याबाबत सकाळी माहिती मिळताच मुलाच्या नातेवाईकांनी मृतदेह जाळून टाकला. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांकडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण संबंधीत प्रेमीयुगुलांचे छायाचित्र व आत्महत्या केल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असताना मुलगा आणि मुलगी यांच्याकडील कुटुंबाने मात्र पोलीसात तक्रार दाखल केली नव्हती. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असली तरी रात्री उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (संबंधीत आत्महत्या केलेल्या मुलगा व मुलगीच्या नावांसह त्यांच्या गावाच्या नावाची माहिती लाईव्ह ट्रेंडस न्यूजकडे आहे. तथापि, अद्यापही पोलीस तपास सुरू असल्याने आम्ही गोपनियतेसाठी याबाबत माहिती जाहीर केलेली नाही)