शिरसोली येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी खून केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (वय-२२) रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्याला आहे. अजय बारी हा खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत असून आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. विवाहितेच्या सोबत सासू, सासरे, जेठ व जेठाणी हे राहतात. प्राजक्ता या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

 

दरम्यान विवाहितेने आत्महत्या केलेली नसून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप विवाहितेचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे रा. शेंदुर्णी ता.जामनेर यांनी केला आहे. विवाहितेचे पती आणि सासरे यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content