हॉटेलातील स्वयंपाकी कारागीराचा अकस्मात मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील हॉटेल लय भारी येथील स्वयंपाकी असलेल्या कारागिराला गुरुवारी दि. ३० रोजी काम करीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ५. ३० वाजेनंतर घडली आहे. कारागीर मूळ नेपाळ येथील राहणार असल्याने त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे.

पुरुषोत्तम गंगा कोईराला (वय ४५, रा. नेपाळ, ह. मु. शिरसोली ता. जळगाव) असे मयत कारागिराचे नाव आहे. तो शिरसोलीतील हॉटेल लय भारी येथे ८ वर्षांपासून खानसामा म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, भाऊ असा परिवार आहे. हॉटेल लय भारी येथील प्रसिद्ध खानसामा म्हणून याची पंचक्रोशीत ओळख होती. गुरुवारी दि. ३० मे रोजी रात्रभर त्याला आम्लपित्ताचा त्रास होत होता. मात्र सकाळी त्याची छाती दुखायला लागली. तेव्हा पुरुषोत्तमने हॉटेल मालक चंद्रशेखर काळे यांना फोन लावला. चंद्रशेखर काळे यांनी कार आणून पुरुषोत्तम कोईराला याला कार मध्ये बसविले. दवाखान्यात नेत असताना वाटेतच पुरुषोत्तम याला जोरात हृदयविकाराचा झटका आला.

तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी शिरसोलीतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पुरुषोत्तम हा कारागीर मूळ नेपाळ येथील राहणार असल्याने त्यांचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आला आहे. पुरुषोत्तम कोईराला याच्या मृत्यूमुळे शिरसोली गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content