अरे बापरे : जामनेरात अल्पवयीन मुलींची गँग अटकेत…! ( व्हिडीओ)

जामनेर प्रतिनिधी | आपण गुन्हेगार्‍यांच्या टोळ्यांबाबत अनेकदा ऐकत असतो, अगदी अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांबद्दलही आपल्याला माहिती आहे. मात्र नियोजनबध्द रितीने महिलांचे मंगळसूत्र व मोबाईल फोन लांबविण्यात वाकबगार असणार्‍या अल्पवयीन मुलींच्या टोळीला आज जामनेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दहा-बारा वर्षे वयोगटातील मुली या महिलांचे मंगळसूत्र, पोत आदी दागिने आणि मोबाईल चोरत असल्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी जामनेर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील आंबीलहोळ येथे एका महिलेचा पाठलाग करून तीन मुलींनी तिचे दागिने चोरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुली सीसीटिव्हीत देखील कैद झाल्याने पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला होता….यानंतर केकत निंभोरा येथे देखील असलाच प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, आज जामनेर पोलिसांना शहरात काही मुली संशयास्पद रितीत फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानुसार महिला पोलिसांचा समावेश असणार्‍या पथकाने तातडीने या सर्व मुलींना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. या सर्व मुली सिल्लोड, जालना आदी परिसरातील असल्याचे त्यांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे….मात्र त्या मुली आपल्या पालकांची नावे सांगत नसल्याचे पोलिसांना आढळून आले. यामुळे त्यांची प्राथमिक चौकशी करून या सर्व मुलींना जळगाव येथील निरिक्षणगृह अर्थात रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजला माहिती देतांना जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी महिलांना आवाहन करत सार्वजनीक ठिकाणी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. विशेष करून भोवती अनोळखी मुलींची संशयास्पद हालचाल आढळून आल्यास सतर्कता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, आजवर अल्पवयीन मुले हे गुन्हेगारी कृत्यात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून त्यांच्या टोळ्यादेखील आढळून आल्या आहेत. काही मुली देखील गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचेही आढळून आले आहे. मात्र अतिशय सुत्रबध्द पध्दतीत अल्पवयीन मुलींचा वापर करून महिलांचे दागिने व मोबाईल फोन चोरण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच समोर आल्याचे मानले जात आहे. या मुलींच्या चौकशीतून अनेक गुन्हे समोर येण्याची शक्यता देखील आहे.

अल्पवयीन मुलींच्या गँगबाबतचा व्हिडीओ आपण खाली पाहू शकतात.

युट्युब व्हिडीओ लिंक :

फेसबुक व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/508992935887325/videos/964467371002790

Protected Content