वडली शिवारातील नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव पाटलांकडून पाहणी

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडली शिवारात सरदार ऍग्रो कंपनीचे बियाणे आणि खते वापरलेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी थेट बांधावर जावून पाहणी करत माहिती जाणून घेतली. त्यांनी तेथून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क करून माहिती दिल्यानंतर या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन देतांनाच शेतकर्‍यांचे कोणत्याही स्वरूपात नुकसान होऊ देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर राज्य शासनाने सरदार कंपनीवर तात्काळ कार्यवाही करत त्यांचा विक्रीचा परवाना रद्द केला असून शेतकर्‍यांना आता नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सरदार ऍग्रो कंपनीची खते वापरणार्‍या शेतकर्‍यांना अडचणी आल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज रोजी तालुकास्तरीय पीक तक्रार निवारण समितीने वडली शिवारातील सरदार ऍग्रो फर्टीलायझर्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खताच्या कापूस पिकावरील नुकसानीच्या अनुषंगाने प्रक्षेत्र भेट केली. या भेटीदरम्यान क्षेत्रावरील कापूस पिकाचे पाने वाकडे होणे आणि गोळा होणे तसेच पिकांची वाढ खुंटणे अशा विविध लक्षणे झाडांवर आढळून आली. याची माहिती मिळताच प्रतापराव पाटील यांनी थेट बांधावर जाऊन शेतकर्‍यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने विक्रेत्यांजवळी सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या बॅगचे चार नमुने घेण्यात आलेले असून सदर नमुने हे खत नियंत्रण प्रयोगशाळा नाशिक येथील प्रयोग शाळेत तपासणी पाठवण्यात आलेले आहेत. सदर उर्वरित मालास विक्री बंद आदेश करण्यात आलेले आहे. तसेच याभेटीदरम्यान ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला व त्यांच्या समस्या व जाणून घेतल्या तसेच अधिकार्‍यांना त्वरित पंचनामे तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तर प्रतापभाऊ पाटील यांनी सदर परिस्थितीत शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनामार्फत बियाणे वाटप करण्यासाठी नियोजन करण्याचे सांगितले. राज्य शासनाने सरदार ऍग्रो कंपनीवर कारवाई केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी तेलबिया संशोधन केंद्रामधील कापूस पैदासकार डॉ गिरीश चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे, पंचायत समिती कृषी अधिकारी धीरज बढे आदी मान्यवर पंचनामा स्थळी उपस्थित होते.

Protected Content