रोटरी क्लब खामगांव द्वारे रोटरी मॅराथॉन सिजन-७चे यशस्वी आयोजन

खामगांव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खामगांव आणि परिसरातील जनतेच्या मनात आरोग्याविषयी चेतना निर्माण व्हावी म्हणून रोटरी क्लब खामगांव दरवर्षी भव्य प्रमाणावर रोटरी मॅराथॉनचे आयोजन करीत असते आणि जनतेकडून त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो.

स्थानिक जनतेला संधी देण्यासाठी स्पर्धा फक्त ३, ५ आणि १० किमी पुरतीच मर्यादित ठेवण्यात आली होती व त्यामुळेच यावर्षी मॅरेथॉनमध्ये शहर आणि परिसरातील ४८० प्रतिस्पर्ध्यांनी यात भाग घेतला. यावर्षी सदर स्पर्धा स्थानिक सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रायोजकत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ ते ८ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ३ किमी (स्त्री-पुरुष वयोगट ४५ पर्यन्त), ३ किमी (स्त्री-पुरुष वयोगट ४५ पेक्षा जास्त), ३ किमी (संयुक्त पती-पत्नी), ५ किमी (स्त्री-पुरुष खुले वयोगट) व १० किमी (स्त्री-पुरुष खुले वयोगट) अशा विविध श्रेणींमध्ये मॅराथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धा संपल्यानंतर त्याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी हे होते तर विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ नीलेश टिबडेवाल, पोलिस उपअधिक्षक वंदना कारखेळे मॅडम आणि सहायक प्रांतपाल डॉ दिलीप भुतडा (शेगांव) हे होते. याशिवाय रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता, प्रकल्पप्रमुख समीर संचेती, सह-प्रकल्पप्रमुख विशाल गांधी, इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ श्रद्धा बोबडे व रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष रजत भैय्या हे उपस्थित होते.

३ किमी (वय ४५ पेक्षा कमी) श्रेणीत महिला गटात कु नर्मदा पुंडकर ही विजेता ठरली तर कु आराध्या अस्वले ही द्वितीय आणि कु संतोषी ढाले ही तृतीय आली. ३ किमी (वय ४५ पेक्षा कमी) श्रेणीत पुरुष गटात देवानंद डांगे हा विजेता ठरला तर महेश ढोले हा द्वितीय आणि विठ्ठल लाथड हा तृतीय आला. ३ किमी (वय ४५ पेक्षा जास्त) श्रेणीत पुरुष गटात शंकर परदेशी हा विजेता ठरला तर भाऊसाहेब शेळके हा द्वितीय आणि महादेव महाले हा तृतीय आला. ५ किलोमीटर श्रेणीत महिला गटात कु प्रणाली शेगोकार ही विजेता ठरली तर कु शारदा श्रावणे द्वितीय आणि डॉ वंदना कारखेळे मॅडम तृतीय आल्या. ५ किलोमीटर श्रेणीत पुरुष गटात आवेश चव्हाण हा विजेता ठरला तर उमेश हाके द्वितीय आणि भूषण इंगळे हा तृतीय आला. १० किलोमीटर श्रेणीत पुरुष गटात अंकित इंदोलिया हा विजेता ठरला तर कृष्णकांत राखोंडे याने द्वितीय आणि ऋषिकेश बावस्कर याने तृतीय स्थान पटकाविले.

सर्व श्रेणींतील विजेत्यांसाठी हजारो रुपयांची भव्य रोख बक्षिसे व मेडल्सचे नियोजन करण्यात आले होते. सहभाग्यांना शर्यतीच्या वाटेत पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रिंक आणि चहा-नाश्ता मोफत देण्यात आले. या स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी नगर परिषद खामगांव द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने रस्ते वाहतूक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. शासकीय सामान्य रुग्णालय व सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी सर्व स्पर्धकांसाठी डॉक्टर्स आणि परिचारकांची आरोग्यसेवा व रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख समीर संचेती, सह-प्रकल्पप्रमुख विशाल गांधी, रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, मानद सचिव किशन मोहता यांचेसह इनरव्हील क्लब व रोटरॅक्ट क्लब आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी अथक प्रयत्न केले.

Protected Content