जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळातर्फे आज ‘कूपनप्रणाली वर्षपूर्ती’ कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कुपनप्रणालीमुळे एजंटगिरी मोडून काढण्यात,दिव्यांग बांधवांची हेळसांड थांबविण्यात यश मिळाल्याचं प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केलं.
“शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाचे काम कूपनप्रणालीमुळे अत्यंत आदर्श झाले असून राज्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणून आपला उल्लेख झालेला आहे. कुपनप्रणालीमुळे एजंटगिरी मोडून काढण्यात व दिव्यांग बांधवांची हेळसांड थांबविण्यात आपण यश मिळविले आहे” असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळातर्फे आज गुरुवारी दि. ४ ऑगस्ट रोजी “कूपनप्रणाली वर्षपूर्ती” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, मंडळ सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड उपस्थित होते.
प्रस्तावनेतून, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. मारोती पोटे यांनी, कुपनप्रणालीविषयी वर्षभरातील आलेले अनुभवांविषयी माहिती दिली. “दिव्यांग बांधवांना तासंतास रांगेत उभे राहणे, त्यात, तपासणीचा वेळ संपून जाणे, तपासणीसाठी आदल्याच दिवशी येणे, येण्याजाण्याबाबतचा त्रास अशा अडचणी पूर्वी येत होत्या. मात्र आता कुपनप्रणालीमुळे दिव्यांग बांधवांचे सर्व त्रास थांबून दिव्यांग बांधवाना तपासणीची आगाऊ तारीख मिळाल्याने तपासणी व्यवस्थितपणे होऊ लागली आहे. त्यानंतर प्रमाणपत्रदेखील वेळेत ऑनलाईन वितरित होऊ लागले आहेत. अडचणी आल्यात, मात्र टीमवर्कमुळे यश मिळाले.” असेही डॉ. पोटे यांनी सांगितले.
कार्यक्रमात, वर्षभर अत्यंत पारदर्शीपणे, निःस्वार्थ, शिस्तबद्ध पद्धतीने कुपनप्रणाली योजना यशस्वी करणारे दिव्यांग मंडळ, कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते भावपूर्ण सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले.
डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, “व्यवस्थेतील उणिवांवर नेहमी बोट ठेवले जाते, मात्र चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करणे राहून जाते. येथील कर्मचाऱ्यांचे काम अनन्यसाधारण आहे.” आता माझ्याकडे दिव्यांग मंडळाच्या तक्रारी येत नाहीत, हे मंडळाचे सुयश आहे, असे सांगत कुपनप्रणाली सुरु करण्याविषयीचा प्रवास त्यांनी सांगितला. टीमवर्क अत्यंत महत्वाचे असून दिव्यांग बांधवांची हेळसांड रोखण्याचे महत्वाचे आव्हान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लीलया पेलले, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी विशाल दळवी, आरती दुसाने, चेतन निकम, दत्तात्रय पवार, प्रकाश पाटील, अजय जाधव, विशाल पाटील, राकेश सोनार, संदीप माळी आदींनी परिश्रम घेतले.