घरातून मोबाईलसह मुद्देमाल लांबविणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील चिंचोली आणि आपना घर कॉलनी असे दोन ठिकाणी चोरी करून मोबाईलांसह चांदीच्या मुर्त्यांची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला चिंचोली गावातून एमआयडीसी पोलीसांनी बुधवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी युवराज भिमराव पवार (वय-४०) यांच्या घरात मंगळवारी २ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री बंद घरातून दोन मोबाईल आणि ५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या देवाच्या मुर्त्या तर दुसऱ्या घटनेत अपना घर कॉलनीत राहणारे विजयकुमार सिंह (वय-३८) यांच्या घरातून दोन मोबाईल असे एकुण २७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी समाधान गोकुळ सपकाळे (वय-२८) रा.मुक्ताईनगर एसएमआयटी कॉलेज जळगाव याला एमआयडीसी पोलिसांनी चिंचोली गाव परिसरातून संशयास्पद फिरत असतांना अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीचा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच संशयित आरोपीवर पुणे शहर आणि जळगावा शहरात एकुण सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. गुरूवार ४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

यांनी केली कारवाई –

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख अतुल वंजारी गफार तडवी रतिलाल पवार सिद्धेश्वर ढापकर चिंचोली पोलीस पाटील मुकेश पोळ यांनी कारवाई केली असून आरोपीकडून अजून बऱ्याच गुन्ह्याची उकल होणार असल्याची शक्यता आहे.

Protected Content