मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज निधन झालं. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग व सामाजिक वर्तुळात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
कॅम्लिन ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई, चिकटवण्याचं साहित्य यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारं सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनं हा कॅम्लिनचा व्यवसाय आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे कंपनीची धुरा वाहिली. त्यांच्या कंपनीनं एक प्रकारे विद्यार्थ्यांपासून कलाप्रेमी ज्येष्ठांच्या आयुष्यात रंग भरले. त्यांच्या निधनाने रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कॅम्लिनचा पसारा वाढवताना त्यांनी मूल्यांशी तडजोड केली नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिले. नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आत्मसात करण्यासाठी जी साधनं उपलब्ध आहेत, त्यांचा पुरेपूर वापर करून सतत शिकण्यावर त्यांचा भर होता. जे मिळवले आहे त्यावर समाधान न मानता आयुष्यात नवी उंची गाठण्यासाठी ते प्रयत्नशील होते. प्रत्येक काम अधिकाधिक चांगलं करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. कॅम्लिनच्या वाटचालीत त्यांच्या याच विचारांचं प्रतिबिंब उमटलं होतं.