विद्यार्थ्यांनी संवाद ठेऊन शिस्त, नियोजनबद्ध शिक्षण घ्यावे : डॉ. जयप्रकाश रामानंद

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षण हे सामाजिक सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शिक्षण आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी एकमेकांशी बोला. संवाद वाढवा. मैत्रीपूर्ण सलोखा जोपासावा. तंत्रज्ञान साक्षर व्हा.  तसेच, शिस्त व नियोजनबद्ध शिक्षण घेण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नवीन प्रवेशित प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व अधिष्ठाता संदेश (डीन्स ऍड्रेस) शुक्रवारी २२ एप्रिल रोजी पार पडला. तसेच याचबरोबर प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिकादेखील सुरु झाल्या. यावेळी मंचावर उप अधिष्ठाता (पदवीपूर्व) डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड, विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शैला पुराणिक, शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरुण कसोटे, न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.वैभव सोनार, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता सुलक्षणे,  जीवरसायनशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री चौधरी उपस्थित होते.

प्रथम दिपप्रज्वलन करून धन्वंतरी पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. तसेच धन्वंतरी स्तवन देखील करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रथम वर्षाला प्रवेशित सर्व १५० विद्यार्थ्यांना  पांढरा कोट देऊन त्यांना नेमप्लेटची पिन लावून महाविद्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, हा वैद्यकीय सेवेचा पांढरा कोट घातल्यानंतर, सेवेप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या तसेच नैतिक व सामाजिक जबाबदारी याबाबतची माहिती उपअधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नवीन सूचनेनुसार विद्यार्थ्यांना महर्षी चरक शपथ देण्यात आली.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांना “डीन अँड्रेस” मधून संबोधतांना सांगितले की, या महाविद्यालयाच्या परिसरात आपण वैद्यकीय उच्च शिक्षण घेण्यासाठी आला आहेत. येथे शिस्त व अभ्यासाचे नियोजन ठेवले तर तुमच्या भविष्यातील करिअरला निश्चित आकार देईल. रोज वृत्तपत्रे वाचा, त्यातील ज्ञानपूर्ण घडामोडी पहा. वैद्यकीय क्षेत्र हे एक ‘नोबेल प्रोफेशन’ असून, ज्ञान, कौशल्याच्या बळावर या पवित्र क्षेत्रात नाव कमवा. यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत राहा.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नामांकित डॉक्टर घडले. त्यामुळे प्रगती करण्यासाठी फार मोठी संधी असून, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, असेही अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना “डीन्स ऍड्रेस” मधून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक समितीची, वसतिगृहाची माहिती इतर प्राध्यापकांनी दिली.

कार्यक्रमाला जनऔषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.भाऊराव नाखले, बालरोग विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोशे, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ.इमरान तेली, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. संगीता गावित, डॉ.प्रशांत देवरे, डॉ. विलास मालकर, डॉ.मोनिका युनाती, प्रा. दिव्या शेकोकार आदी प्राध्यापक उपस्थित होते.

सूत्रसंचालन महाविद्यालय प्रतिनिधी राज सिंग याने तर आभार तानिया फातेमा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी डॉ.भाग्यश्री पाटील, डॉ.गौरांग चौधरी, डॉ.ऐश्वर्या पाटील,  जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील, संदीप माळी, राकेश सोनार, अजय पाटील आदींनी सहकार्य केले. तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content