राज्यात विद्यार्थ्यांना आता ‘समान संधी केंद्र’च्या वतीनं मिळणार मार्गदर्शन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा’ने निर्देशीत केल्यानुसार विविध कार्यक्रम राबविण्यासाठी आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्देशीत केल्यानुसार राज्यातील विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्री.शिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करणे. तसेच संवाद, अभियान, युवा संवाद यासारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता आता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ (Equal Opportunity Centre) स्थापन करण्याचे समाज कल्याण विभागाने ठरविले आहे.

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान ‘एक प्राध्यापक व सहाय्यक’ म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच ‘समान संधी केंद्रे’ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत ‘भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती’ योजनेच्या सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपायोजना करण्याचे ठरवले आहे. सदर “समान संधी केंद्राच्या” माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींचा सर्वसमावेशक मार्गदर्शन याद्वारे करण्यात येणार आहेत.

यासंदर्भात मा.आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी दि. ०३ फेब्रुवारी, २०२२ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राज्यातील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये या स्वरूपाची केंद्रे तात्काळ चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालय चालू नसले तरी प्रत्येक महाविद्यालयाने सदर ‘समान संधी केंद्राची’ स्थापना करून महाविद्यालय निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून त्यासाठी ‘व्हाट्सअप ग्रुप’ तयार करावा किंवा इतर समाज प्रसार माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करणे बाबत सुचित करण्यात आले आहेत.

याबाबत जळगावच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व प्राचार्यांच्या ऑनलाईन बैठका घेण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर ‘समान संधी केंद्रे’ (Equal Opportunity Centre स्थापन करण्याचे आवाहन समाज कल्याण विभाग जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

 

Protected Content