Home Cities चोपडा विद्यार्थी बनले शिक्षक ! अडावदच्या शामराव येसो महाजन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

विद्यार्थी बनले शिक्षक ! अडावदच्या शामराव येसो महाजन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

0
3


अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन आगळ्यावेगळ्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘एक दिवस शिक्षकांचा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत संपूर्ण शाळेचे दिवसभराचे कामकाज सांभाळले. त्यामुळे गुरु-शिष्यांच्या नात्यातील हा अनोखा सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात अध्यापन करण्याची जबाबदारी स्वीकारली नाही, तर मुख्याध्यापकांपासून शिपायांपर्यंत विविध भूमिका प्रभावीपणे पार पाडल्या. दररोज एकत्र खेळणारे आणि बागडणारे आपलेच सवंगडी शिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विद्यार्थी-शिक्षकांनी घेतलेल्या तासांचा इतर विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे आनंद घेतला. ‘एक दिवस शिक्षकांचा’ या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी-शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकाची भूमिका प्रत्यक्ष अनुभवताना अध्यापनासोबतच शिस्त, नियोजन, विद्यार्थ्यांशी संवाद आणि जबाबदारीचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनुभवता आले. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि नेतृत्वगुणांना चालना देणारा ठरला. दुपारच्या सत्रात विद्यालयाचे उपशिक्षक एन. ए. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन करून करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात एन. ए. महाजन यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व, शिक्षणाची भूमिका आणि गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

यावेळी विद्यार्थी-शिक्षिका पूर्वी अशोक माळी हिने आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनाचे महत्त्व सांगतानाच दिवसभर शिक्षकाची भूमिका पार पाडताना आलेला अनुभव तिने उपस्थितांसमोर मांडला. शिक्षक म्हणून काम करताना जबाबदारीची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली आणि हा अनुभव समृद्ध करणारा ठरल्याचे तिने सांगितले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन एस. जी. महाजन यांनी केले. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, ईश्वर मिस्तरी आणि रवींद्र महाजन यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound