विद्यार्थ्यांनो संस्कारांची कास धरा – रविंद्र पाटील

पहूर, ता. जामनेर ( वार्ताहर ) विदयार्थ्यांनो , शिक्षणासोबतच सुसंस्कारांची कास धरा, आज संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असून स्वतःशी स्पर्धा करा , त्यातून निकोप समाज उदयास येईल असे प्रतिपादन पाचोरा येथील इतिहास प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले. पहूर येथील कर्मयोगी कॅप्टन डॉ. एम. आर. लेले यांच्या अठराव्या स्मृतीदिनी आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.

बुधवारी आर .टी. लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘तेथे कर माझे जुळती ‘ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी पहूर गृप एज्यूकेशन संस्थेचे सचिव डॉ .ए.एम. लेले होते. प्रारंभी प्रतिमा पुजन करण्यात आले. पाटील म्हणाले की , कर्तृत्वाने संपन्न असणारी माणसं या भूमीत जन्मास आली . आपणांस मोठा शौर्याचा इतिहास लाभला आहे. नव्या पिढीने हा वारसा जोपासला पाहीजे. टी.व्ही.पासून विद्यार्थ्यांनी स्वतःची सुटका करावी असे सांगून त्यांनी महापुरूषांच्या प्रेरक कथा सांगून विदयार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक सी .टी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, अॅड. एस.आर. पाटील, सरपंचपती रामेश्वर पाटील, डॉ. प्रशांत पांढरे, रवींद्र पांढरे, बापू सोनार, शंकर भामेरे आदींची यावेळी उपस्थिती होती . प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन व्ही .व्ही. बोरसे यांनी केले .आभार पर्यवेक्षक व्ही .जी. भालेराव यांनी मानले . यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content