
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात तीन दिवसांच्या भव्य क्रीडा स्पर्धेचा उत्सव रंगात आला असून, महिला खेळाडूंच्या सहभागाने आणि उत्कटतेने संपूर्ण क्रीडांगण भारावले आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी आपल्या क्षमतेचे आणि जिद्दीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर विविध क्रीडा प्रकारांचे सामने सुरू झाले. भालाफेक या प्रकारात चुरशीची स्पर्धा रंगली. नाशिकच्या एसएमआरके महाविद्यालयाच्या पृथ्वी शेट्टी हिने या प्रकारात बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. सोलापूरच्या साक्षी ठोंबरे हिने द्वितीय, तर अकलूजच्या सोनाली वाघमोडे हिने तृतीय क्रमांक मिळवला. उंच उडीमध्ये सांगलीच्या साक्षी माळी हिने सर्वोत्तम उडी घेत पहिला क्रमांक मिळवला. श्रीराम महाविद्यालय, पाणीवच्या स्वप्नाली आद्रट हिने दुसरा व कीर्ती काटे हिने तिसरा क्रमांक पटकावला.
८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुंबईच्या जाधव महाविद्यालयाच्या दिव्या पिंगळे हिने २ मिनिटे ३८ सेकंदात शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. तिच्याच महाविद्यालयाच्या स्नेहल पाटील हिने २ मिनिटे ५५ सेकंदात धाव घेत तृतीय क्रमांक मिळविला. दरम्यान, सांगलीच्या सानिका केरिपाळे हिने २ मिनिटे ४४ सेकंदात शर्यत पूर्ण करत दुसरा क्रमांक मिळवला. ५ हजार मीटर स्पर्धेत देखील दिव्या पिंगळे हिचीच विजयी घोडदौड पाहायला मिळाली. तिने २० मिनिटे ८ सेकंदात शर्यत पूर्ण केली. अदिती पाटील हिने दुसरा, तर प्रतीक्षा चोरमले हिने तिसरा क्रमांक पटकावला.
१०० मीटर शर्यतीत माटुंगा महाविद्यालयाची मंजुषा शेट्टी ही पहिल्या क्रमांकावर राहिली. चर्चगेटच्या ऋणाली पाटील दुसऱ्या तर शाह महाविद्यालय, सांगलीच्या पल्लवी बगाडी तिसऱ्या स्थानावर राहिली. ४०० मीटरमध्ये अदिती पाटील हिने प्रथम, मंजुषा शेट्टी हिने द्वितीय आणि स्नेहल पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला. गोळाफेकीत पृथ्वी शेट्टी हिने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवत पहिला क्रमांक पटकावला. पुण्याच्या अनुष्का शिंदे दुसऱ्या तर मालाडच्या ऋतुजा देवकर हिने तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली.
दुपारी स्पर्धेचे केंद्र गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हलवण्यात आले. येथे व्हॉलीबॉल, रस्सीखेच व तायक्वांदो या सामूहिक स्पर्धा रंगल्या. प्रत्येक सामन्यात उत्साह, चुरस आणि खेळाडूंच्या उत्स्फूर्ततेचे दर्शन घडले. तायक्वांदोमध्ये महिलांनी आक्रमक आणि तितक्याच रक्षणात्मक खेळाचे सुंदर उदाहरण सादर केले. रस्सीखेचमध्ये संघांनी ताकद आणि एकजुटीचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
या भव्य क्रीडा महोत्सवात सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. कविता खोलगडे, डॉ. नीलिमा वारके, प्राचार्या कविता देशमुख आणि डॉ. प्रमोद वारके यांनी उपस्थिती लावली. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांच्या मेहनतीची स्तुती केली.



