कर्मचारी संपावर ठाम : राज्यभरात एसटीचा चक्का जाम !

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी संघटनांनी आपला संप सुरूच ठेवला असल्याने आज देखील राज्यभरात एसटीचा चक्का जाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे यामुळे राज्यातील लक्षावधी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप आज मंगळवारी देखील सुरूच असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनात विलीनीकरण करावे आणि शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन द्यावे, या मागण्यांसाठी गेल्या १३ दिवसापांसून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर सोमवारीही तोडगा निघाला नाही. न्यायालयाने आपल्या आदेशात नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे शासननिर्णय आम्हाला मान्य नाही. तुरुंगात जाऊ, परंतु संप मागे घेणार नाही, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे ऍड्. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर सकाळी संघटनांनी समिती आणि शासन निर्णयाबाबतचा निर्णय मान्य के ल्याकडे लक्ष वेधून आता आणखी तुम्हाला काय हवे, अशी विचारणा न्यायालयाने के ली. त्यानंतरही शासननिर्णय मान्य नसल्याचे आणि संपावर कायम राहणार असल्याचे संघटनेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे राज्यातील २५० पैकी सुमारे २४० आगारे बंद झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बसच्या कर्मचार्‍यांच्या संपाचा खासगी वाहतुकदारांनी फायदा घेत अव्वाच्या सव्वा आकारणी केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका देखील बसला आहे.

Protected Content