मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांनाच नागरिक नियम पाळत नसल्याने दोन दिवसात निर्णय घेऊन कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिला.
राज्यातील कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमिवर आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांबाबत विवेचन केले. ते म्हणाले की, राज्यात एकूण १७६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ९१ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात ८७ टक्के लोकांना कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. मुंबईत दररोज ५१ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. मागील ७ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाच्या लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे.
केंद्राची टीम सध्या महाराष्ट्राच्या दोन-तीन दिवसांच्या दौर्यावर आहे. ही टीम वाढलेले रुग्ण, त्यांचे प्रमाण, ओमिक्रॉनचे रुग्ण, लसीकरण, पहिला डोस आणि दुसरा डोस घेणार्यांची संख्या या सार्यांचे अवलोकन करणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल. मात्र, लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे. स्थानिक नेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा क्वारंटाईन काळ कमी करण्याबाबतचा निर्णय हा आयसीएमआरच्या निर्देशानुसार घेण्यात येईल. गरज पडल्यास आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. मात्र, ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा आणि काळजी घ्या. महाराष्ट्रात आपण दिवसाला ८ लाख लसीकरण करत होतो, आता आपण ५ लाख लसीकरण करत असून याबाबत त्यांनी खंत व्यक्त व्यक्त केली. तर, १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीने सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिलेली नाही. बूस्टर डोसचे लसीकरण १० जानेवारीपासून होणार असल्याचे ते म्हणाले.