सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला मनोज जरांगे यांचा विरोध; आंदोलनावर राहणार ठाम

आंतरवली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. सगेसोयऱ्याची अंबलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी हाताला असलेले सलाईन देखील काढून टाकले आहे. आता उद्या आंतरवलीत निर्णायक बैठक होणार असून पुढील आंदोलन जाहीर करणार असे जरांगे म्हणाले. राज्य सरकारने मंगळवारी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांत 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे हे विधेयक विधानसभेच्या पटलावर सादर केले होते. मात्र तरीही जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.

जरांगे म्हणाले, करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवं आहे. जे आरक्षण आम्हाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच. सरकारने दिलेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ते न्यायालयात टिकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या हक्काचं ओबीसीमधील आरक्षण आम्हाला हवे आहे”. ”प्रत्येकवेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे. हरकतीचा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही. आम्ही वेळ दिलाय, संयम ठेवलाय, हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. उद्या 12 वाजता आंतरवालीमध्ये निर्णायक बैठक होणार असून, आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार”, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

जरांगे म्हणाले, ”सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळाले नाही तर विधिमंडळात पारित होऊ घातलेल्या मराठा आरक्षण विधेयकाचा बहुतांश समाजाला कोणताही फायदा नाही. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मराठा समाज झुंजत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायद्यासाठी अधिवेशन बोलावले आहे. पण या कायद्यातंर्गत मिळालेल्या स्वतंत्र आरक्षणाचा फायदा केवळ 150 ते 200 मराठ्यांनाच मिळणार आहे”, असे ते म्हणाले. जरांगे म्हणाले, ”दोन-तीन लोकांना मराठा समाजाचं वाट्टोळं करायचं आहे. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू झाले. तेव्हा नोकरीसाठी मराठा तरुणांच्या निवडी झाल्या, पण नियुक्त्या झाल्या नाहीत. या पोरांच्या हातात आता पेन हवा होता, पण आज या पोरांच्या हातात आंदोलनाचं हत्यार आहे. त्यांचं वय निघून जात आहे. आताही मराठा आरक्षण टिकलं नाही तर तेच होणार. त्यापेक्षा आम्हाला ओबीसीत असणारं आमचं आरक्षण द्या. ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच स्वतंत्र संवर्गाचे आरक्षण मराठा समाजाचे नुकसान करणारे आहे. तुम्हाला दोन-तीन लोक महत्त्वाचे आहेत की 6 करोड मराठा महत्त्वाचे आहेत, असा सवाल जरांगे-पाटील यांनी विचारला आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. गेल्या कित्येक दिवसांत राज्य सरकारचे शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी आपल्याशी चर्चा करायला आले नाही असे म्हणत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ”प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार येतो. त्यांच्या सांगण्यानुसार वागलो तर आपण चांगले ठरतो. त्या लोकांना कामं असतात, ती मोठी लोकं आहेत, त्यांच्या विमानाचा खर्च वाया जातो. ते विमानातील डिझेलसाठी गरिबांचा पैसा उडवतात. पण त्यांच्याकडे सामान्य मराठ्यांचा आक्रोश, किंकाळ्या बघायला वेळ नाही”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान, राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाईल. काही दिवसांपूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी राज्य सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष आहे.

Protected Content