वडीलोपार्जित शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधात ९ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । वडीलोपार्जीत शेतजमिनीचा वाद आणि मागील भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील वाघळी येथे दोन गटात तुफान हाणामारी लोखंडी रॉड व कुऱ्हाडीने वार करून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. यात परस्परविरोधात ९ जणांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वाघळी शिवारात वडिलोपार्जित शेतजमिनीचा वाद आणि मागील भांडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात पहिल्या गटातील भुषण गोकुळे जाधव (वय-२६) रा. वाघळी ता. चाळीसगाव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वाघळी शिवारातील चांभार्डी ते वाघळी रोडलगत असलेल्या शेतात शेतीच्या वादातून नितीन राजेंद्र जाधव, दिपक राजेंद्र जाधव, आंबादास भगवान जाधव, मिराबाई राजेंद्र जाधव आणि गंगुबाई भगवान जाधव सर्व रा. वाघळी यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यातील नितीन जाधव याने लोखंडी फावडी हातात घेवून भुषण जाधव यांच्या डोक्यात मारून जखमी केले. यात भुषणचा भाऊ पवन  जाधव हा सोडवासोडव करण्यासाठी आला असता त्याला ढकलून दिले व बेदम मारहाण केले. यातील संशयित आंबादास जाधव यांने आज आपण यांना संपवून टाकू अशी धमकी दिली. भुषण जाधव याच्या फिर्यादीवरून नितीन राजेंद्र जाधव, दिपक राजेंद्र जाधव, आंबादास भगवान जाधव, मिराबाई राजेंद्र जाधव आणि गंगुबाई भगवान जाधव यांच्या चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुसऱ्या गटातील फिर्यादी नितीन राजेंद्र जाधव याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेतीचा जुन्या वादातून संशयित आरोपी गोकुळ भिकन जाधव, सुधिर भिकन जाधव, पवन गोकुळ जाधव, भुषण गोकुळ जाधव सर्व रा. वाघळी ता.चाळीसगाव यांनी संगनमताने ४ ऑगस्ट रोजी सकाळी शेतात नितीन जाधव याच्या अंगावर तिखट पावडर टाकली तर पवन आणि भुषण यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात नितीन जाधव याचा कान कापला गेला. तर नितीनचा भाऊ दिपक राजेंद्र जाधव यांला ठार मारण्याच्या उद्देशातने लोखंडी रॉड पाठीवर बेदम मारहाण केली. तर गोकुळे भिकन जाधव याने फिर्यादी नितीन राजेंद्र जाधव यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गोकुळ जाधव, सुधिर जाधव, पवन जाधव आणि भुषण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरवडे करीत आहे. 

Protected Content