पहूर येथे विनाअनुदानित शिक्षकांचे रास्तारोको (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 08 10 at 1.57.53 PM

जामनेर, प्रतीनिधी | राज्यातील विनाअनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देऊन शिक्षकांना वेतन आयोग लागू करा या व अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळा महाविद्यालय कृती समितीने पहूर येथे रास्तारोको आंदोलन केले. ५ ऑगस्टपासून शिक्षकांनी शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन केल्याने सहा दिवसांपासून जिल्ह्यातील ७५ पैकी सुमारे ४० पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. तर पहूर येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मागणीस पाठींबा देत रॅली काढली.

मागील १८ वर्षापासून विना वेतन ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना हक्काचा पगार सुरू करावा, या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षक कृती समितीचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. यात पहूर येथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वेतन तत्काळ करावे यासाठी रॅली काढली होती. मूल्यांकन व निकषांची पूर्तता करून अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या या शाळांना अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ पहूर-औरंगाबाद मार्गावर तासभर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नाशिक विभाग अध्यक्ष अनिल परदेशी, जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, रुपेश चौथे, राहुल निकम, राजेंद्र परदेशी, संदीप राजपूत, वसंत गांगुर्डे, विलास काळे, अशरद तडवी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ५० शिक्षक यात सहभागी झाले होते. दरम्यान, यावर निर्णय न लागल्यास स्वातंत्र दिनी सामूहिक आत्महदनाचा इशारा या वेळी देण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.

Protected Content