काय सांगता….एरंडोलात दगडांचा पाऊस ? : नागरिकांचा दावा !

एरंडोल, रतीलाल पाटील । आजवर पावसासोबत गारा पडत असल्याचे आपण ऐकले/पाहिले असेल. वा वादळी वारा असेल तर पाला-पाचोळा व अन्य लहान वस्तू उडून येत असल्याचेही आपण पाहतो. मात्र एरंडोल येथे पावसासोबत चक्क लहान दगड पडल्याचे साने गुरूजी कॉलनीतील नागरिकांनी अनुभवले असून यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत गारांचा पाऊस पडतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवत होतो परंतु एरंडोल येथील साने गुरुजी कॉलनीत रहिवाशांना वेगळाच अनुभव आल्याचा प्रत्यय आला आहे. दिनांक ७ जुन रोजी संध्याकाळी ६:३० ते ७:०० वाजे दरम्यान जवळपास अर्धातास तुरळक पाऊस झाला व यावेळी पावसासोबत अचानक दगड आकाशातून पडतांना साने गुरुजी कॉलनीत राहणार्‍या नागरिकांनी पाहिले.

कॉलनीतील रहिवाशी गणेश माळी, सिताराम पाटील,विवेक पाटील,हिम्मत पाटील व ललिता महाजन यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की आधी आम्हाला वाटले गारा पडत आहेत. परंतु बाहेर पाहिल्यावर कळले की चक्क दगड पडत होते.आधी वाटले कोणी फेकत असतील परंतु व्यवस्थित निरीक्षण केल्यावर लक्षात आले की ही दगड आकाशातून पडत होती. संबंधीत दगड साधारण एक ते दीड इंचाचे असुन त्यांचे आकारमान हे वाळूसोबतच्या गुळगुळीत दगडाप्रमाणे आहेत. यात काही दगड लाल तर वेगवेगळ्या रंगांचे देखील आहेत. यावेळी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत होता. दगड उचलण्यासाठी डोक्यावर अक्षरशः घमेली घेऊन दगड उचलले असल्याचे गणेश माळी व सिताराम पाटील यांनी सांगितले.

यातील एक दगड ललिता महाजन यांच्या पायाला देखील लागला असल्याचे त्यांनी सांगितले.सिताराम पाटील यांच्या पत्नी यांनी सदर दगड देवाचे दगड असल्याचे लोकांनी सांगितल्याने ते दगड घरातील देव्हार्‍यात ठेवले असल्याचे सांगितले. सदर दगडांचा पाऊस ५० ते ६० फुटांच्या अंतरावर एकच ठिकाणी झाला असुन साने गुरुजी कॉलनीत ८ ते १० घरांवरच तो पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.सदर घटने बद्दल कॉलनीतील रहिवाशी आश्‍चर्य व्यक्त करत असले तरी मनात भिती होती की बरं झाले दगड छोटे – छोटे होते ! मोठे असते तर कदाचित मोठे नुकसान झाले असते.

दरम्यान शहरातील साने गुरुजी कॉलनीत झालेल्या या प्रकारामुळे सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे तसेच निरनिराळे तर्क वितर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र यामागे भौगोलिक कारण असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत असून शास्त्रज्ञ याबाबत अधिक माहिती देऊ शकतात असेही याप्रसंगी काहींनी मत व्यक्त केले आहे.

Protected Content