जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धार्मिक स्थाळी सुरु असलेल्या बांधकामाला विरोध करण्याच्या कारणावरुन सुप्रिम कॉलनी परिसरात दोन गटात वाद झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाल्याची घटना रविवारी दुपारी सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळ घडली. यामध्ये ६ जण किरकोळ जखमी झाले आहे.या घटनेनंतर दोन्ही गटातील सुमारे शेकडो जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात एका धार्मिक स्थाळाचे बांधकाम सुरु होते. या कामाला एका गटातील काही जणांकडून विरोध करुन कामात अडथळा आणीत होते. यावरुन रविवारी ९ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. मात्र वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन्ही गटातील रविंद्र राठोड, समाधान राठोड, साजन राठोड, पवन पाटील, दिपक घुगे, श्रीकांत चौधरी असे एकुण ६ जण किरकोळ जखमी झाले आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे सुप्रिम कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपुर्ण शांतता आहे.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्ळे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर बैठक घेवून परिसरातील नागरिकांना शांतता राखण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.