उद्धव ठाकरे यांच्याबाबत अजूनही आदर : केसरकर

पणजी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांनी शिवसेना संपविण्याचे काम केले असून त्यांच्यावरच आमचा राग आहे, तर उध्दव ठाकरे वा ठाकरे कुटुंब यांच्याबाबत आमच्या मनात अजूनही आदरच आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आम्हाला दु:ख झाले अशा शब्दांमध्ये दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाची भूमिका मांडली

दीपक केसरकर यांनी आज गोव्यात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी जल्लोष साजरा केल्याचे वृत्त हे चुकीचे आहे. आम्ही कुणी देखील खुश नाहीत. त्यांच्या राजीनाम्यामुळे आम्हाला दु:ख झालेले आहे. उध्दव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाबत आम्हाला आज देखील आदर आहे. मात्र महाविकास आघाडीच्या रूपाने जे काही घडत होते ते शिवसेनेच्या मुळावर उठणारे असल्याने आम्ही हे पाऊल उचलल्याचे प्रतिपादन केसरकर यांनी केले.

केसरकर पुढे म्हणाले की, संजय राऊत यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले. दररोज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका करणे एवढेच त्यांना माहित होते. शिवसेनेच्या आमदारांचे खच्चीकरण होत असतांना उध्दव ठाकरे यांनी कोणताही हस्तक्षेप केला नसल्याची आम्हाला वेदना होती. यातून आम्ही नवीन मार्ग निवडला असून शिवसेना हा पक्ष एकसंघ असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

 

Protected Content