सस्पेन्स संपला : रावेरात रक्षा खडसेंविरूध्द डॉ. उल्हास पाटील यांची होणार टक्कर

जळगाव प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून सुरू असणारा सस्पेन्स संपवत आज काँग्रेसतर्फे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या मतदारसंघातून रक्षा खडसे विरूध्द डॉ, उल्हास पाटील अशी लढत रंगणार आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पहिल्याच यादीत विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी झपाट्याने प्रचारदेखील सुरू केला आहे. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराबाबत आजवर संभ्रमाचे वातावरण होते. पहिल्यांदा हा मतदारसंघ राष्ट्रवादी लढविणार की काँग्रेस ? यावरून तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्यालाच असल्याचे अधोरेखीत झाल्यानंतर उमेदवारांबाबत चर्चा सुरू झाली. यात माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, उद्योजक श्रीराम पाटील आदी नावांबाबत चर्चा करण्यात आली. तर अलीकडेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला असून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. आज ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

डॉ. उल्हास पाटील यांनी याआधी अवघ्या १३ महिन्यांसाठी आधीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. यानंतर त्यांना दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर तर एकदा अपक्ष म्हणून लढतांना अपयश आले. यामुळे आता ते रक्षाताई खडसे यांना तुल्यबळ लढत देऊन विजय मिळवतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Add Comment

Protected Content