महाजन व पाटील यांची आधीपासूनच हातमिळवणी : खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकनाथ शिंदे यांनी आता बंड केले असले तरी त्यांच्या गटाची  कधीपासूनच हातमिळवणी असल्याचा गौप्यस्फोट आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यातील सख्याचा दाखला दिला आहे.

मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना आमदार एकनाथराव खडसे यांनी आजच्या स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, आजपर्यंतचा इतिहास आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कधीही टीका केली. सरकारमध्ये असताना भाजपच्या आमदारांची कामे त्यांनी मंजूर केली. त्यामुळे त्यांचा निर्णय पूर्वीपासून भाजप सोबत जाण्याचा होता. त्याचप्रमाणे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अनेकदा शिवसेनेवर खालच्या पातळीवरचे आरोप केले. मात्र याला जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. गुलाबराव पाटील यांनी कधीही गिरीश महाजन यांच्यावर टीका केली नाही. दोन्ही गोष्टींवरून असे सिद्ध होते की या बंडखोर आमदारांच्या मनात आताच नव्हे तर पूर्वीपासूनच भाजपसोबत जाण्याचा विचार होता आणि तेच आता सर्व जगाच्या समोर आलं आहे.

दरम्यान त्यांनी राज्यपालांवरही टीका केली. ते म्हणाले की, भाजप नेते मंगळवारी राज्यपालांना भेटले आणि महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचा दावा केला. राज्यपालांनीही तत्काळ अधिवेशन बोलवण्याची सूचना सरकारला केली. मात्र राज्यपालांनी जी तत्परता आता दाखवली तीच गेल्या दोन वर्षात १२ आमदारांची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे केली होती. ती यादी तत्परतेने मंजूर केली असती तर राज्यपालांबद्दलचा आदर वाढला असता,’ असा टोला खडसे यांनी लगावला आहे.

 

 

Protected Content