जिल्हा बँक संचालिका जनाबाई महाजन यांच्या अपात्रतेला स्थगिती !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वेळेत खर्च सादर न करण्याच्या कारणावरून अपात्र करण्यात आलेल्या तत्कालीन जिल्हा बँक संचालिका जनाबाई गोंडू महाजन यांना कोर्टाने दिलासा दिला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक गेल्या वर्षाच्या अखेरीस झाली होती. यात रावेर सोसायटी मतदारसंघातून अखेरच्या क्षणाला उमेदवारी करणार्‍या जनाबाई गोंडू महाजन यांनी माजी आमदार अरूणदादा पाटील यांना एक मताने पराभूत करून एकच खळबळ उडवून दिली होती. या निकालाची मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान जनाबाई महाजन यांनी विहित नियमानुसार निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याची तक्रार अरूणदादा पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांनी केली होती.

या तक्रारीवरून विभागीय संयुक्त आयुक्त सहकार संस्था यांनी जनाबाई गोंडू महाजन यांना १९ डिसेंबर २०२२ रोजी अपात्र ठरविले होते. तसेच त्यांना तीन वर्षे निवडणूक लढविण्यासाठी बंदी देखील घालण्यात आली होती. या निकालाच्या विरोधात जनाबाई गोंडू महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यात त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ज्ञ व्ही. डी. होन यांनी बाजू मांडली. त्यांनी तीन मुद्यांवरून युक्तीवाद केला. यात त्यांनी विभागीय संयुक्त आयुक्त सहकार संस्था यांनी जनाबाई महाजन यांनी खर्चा सादरीकरणाच्या विलंबासाठीचे कारण विचारात घेतलेले नसून त्यांचा जबाब नोंदविला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे जनाबाई महाजन यांनी विहीत वेळेत खर्च सादर न करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्या कोविडने बाधीत असल्याकडेही त्यांनी कोर्टाचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, या खटल्यात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात युक्तीवाद करण्यात आले. यानंतर न्यायमूर्ती अरूण पेडणेकर यांनी निकाल दिला. यात त्यांनी मंदार मनोहर पाटील यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे नमूद करत जनाबाई गोंडू महाजन यांची याचिका ही काही अंशी स्वीकारण्यात आली असून त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती देत असल्याचे नमूद केले आहे.

Protected Content