मुक्ताईनगर तालुक्यातील प्रलंबित मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची भेट घेऊन शासकीय योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तातडीने देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली.

मुक्ताईनगर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजने प्रकरण मंजुरी अभावी प्रलंबित होते. तसेच त्यापूर्वी समितीच्या झालेल्या बैठकीत मंजुरी मिळालेल्या लाभार्थींची यादी प्रकाशित न केल्यामुळे पात्र लाभार्थी यांना अनुदान पासून वंचित राहावे लागत होते. हि बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची भेट घेऊन लवकर संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीचे आयोजन करून तत्काळ प्रलंबित प्रकरणांना मंजुरी द्यावी व यापूर्वीच्या बैठकीत मंजुर प्रकरणांची यादी प्रसारित करून पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

निवेदनात अशी केलेली मागणी

समाजातील अंध, अपंग, विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालवण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजने द्वारे आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी तालुका भरातील पात्र लाभार्थी यांनी या योजनांच्या लाभासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या प्रकरणांना मंजुरी मिळून योजनेचा लाभ मिळेल या आशेवर मुक्ताईनगर तहसील कार्यालयात संबंधित विभागाकडे प्रकरण दाखल केलेले आहे. परंतु  प्रकरणांना मंजुरी देणाऱ्या समितीची गेल्या तीन चार महिन्यांपासून बैठक झाली नसल्या कारणाने हजारो प्रकरण मंजुरी अभावी तहसील कार्यालयात पडून आहेत या प्रकरणांना मंजुरी मिळत नसल्या कारणाने समाजातील पात्र लाभार्थी योजनांच्या लाभा पासून वंचित राहत आहे. तसेच यापूर्वी झालेल्या समितीच्या बैठकीत मंजूर प्रकरणाची यादी अद्यापही प्रसिद्ध केली गेलेली नाही. त्या कारणाने मंजूर प्रकरणाच्या लाभार्थी ना पण योजनांचा लाभ मिळत नाही आहे. तरी  तहसीलदार यांनी  समितीचे सचिव या नात्याने या समितीची तत्काळ बैठक आयोजित करून प्रलंबित प्रकरणांना तत्काळ मंजुरी द्यावी व मागील बैठकीत  मंजूर लाभार्थी यांची प्रसिद्ध करावी व पात्र लाभार्थी यांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.

त्यावर तहसीलदार श्वेता संचेती यांनी मागील बैठकीत मंजुर प्रकरणांची यादी तत्काळ प्रसिद्ध केली तसेच या महिन्यापासून पात्र लाभार्थी यांच्या खात्यात त्यांचे अनुदान जमा होईल असे सांगितले तसेच लवकरच समितीच्या बैठकीचे आयोजन करून प्रलंबित प्रकरणांना मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले

निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु भाऊ माळी, माजी प स सभापती विलास धायडे, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापु ससाणे, प्रविण पाटील,बाळाभाऊ भालशंकर, योगेश काळे, मधुकर गोसावी,संजय कोळी, प्रदिप साळुंखे, बबलू सापधरे,शकील खान, चेतन राजपूत, बुलेस्ट्रिन भोसले, शफी भोसले, विठ्ठल जोगी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Protected Content