गट सचिवांच्या विविध मागण्यांबाबत आमदार किशोर पाटील यांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी | मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवार, दि. ८ डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी बहिष्कार आणि बेमुदत धरणे आंदोलन होणार असून याबाबत जिल्ह्यातील गट सचिव यांनी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

राज्यभरातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये कार्यरत असलेले गट सचिवांचे सेवा व वेतनाचे प्रश्न सोडवण्यास शासन उदासीन आहे. त्यामुळे राज्यभरातील गट सचिव आणि संस्था नियुक्त सचिव यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची निवडणूक कामकाज व होऊ घातलेल्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा आणि सर्व शासकीय माहिती न देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निवेदनात, “राज्यातील विकास सोसायट्यांमध्ये सन – २००४ पासून सचिवांची भरती केली नाही. एका सचिवाकडे दोन-दोन तीन-तीन सोसायट्यांचा कारभार, यामुळे सेवा वेतनाचे सर्व कायदे व नियम मोडीत काढले आहेत. त्याचबरोबर राज्यातील गट सचिवांना लोकसेवकाचा दर्जा देऊन शासकीय सेवेत सामावून घेणे, औद्योगिक न्यायालय पुणे यांच्या आदेशानुसार व यशवंतराव गडाख यांच्या समितीच्या शिफारशीनुसार समान काम समान वेतन लागू करावे या मागण्या आहेत

यासह “महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ (१) अन्वये दिले दि. ६ डिसेंबर २०१० चे निर्देश अंमलबजावणी करणे, संस्था सक्षमीकरणाच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती शिथिल करून मीना ८ निधी संस्थांना द्यावा, अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घ्यावे, संस्था नियुक्त खासगी सचिवांना सवर्गीकरण योजनेअंतर्गत समावेश करावा” या मागण्यांचे निवेदन आमदार किशोर पाटील यांना देण्यात आले. आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यानी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडाव्यात..” अशा स्वरूपाचे निवेदन जळगाव जिल्ह्यातील गट सचिव यांनी केले. याप्रसंगी राज्य संघटना प्रतिनिधी राहुल बोरसे, संघटनेचे उपाध्यक्ष मनोज साळुंखे, जगदीश ठाकरे, गणेश पाटील, प्रमोद पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.

Protected Content