ब्रेकींग : जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर; शामकांत सोनवणे उपाध्यक्ष !

जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांना संधी मिळणार असून आज झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन्ही मान्यवरांची निवड अविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक खूप मोठ्या प्रमाणात गाजली. यात बरेच दिवस सर्वपक्षीय पॅनलचे गुर्‍हाळ सुरू होते. मात्र शेवटच्या टप्प्यात भाजपला गाफील ठेवत महाविकास आघाडीने पॅनल बनविण्याची घोषणा केली. तर भाजपने सत्ताधारी आघाडी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला. यामुळे भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ऐन वेळेस निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली.

जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सत्ता वाटपाच्या सूत्राची माहिती दिली. ते म्हणाले की, पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळणार असून नंतरची दोन वर्षे शिवसेनेला अध्यक्षपद मिळणार आहे. तर पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार आहे. या अनुषंगाने उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली. तर, तर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जशी एकत्र होती, तशीच निवडणुकीनंतरही राहणार आहे.

दरम्यान, काल खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या संचालकांनी बैठक झाली. यात एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चीत करण्यात आल्याची माहिती दिली. तर शिवसेनेतर्फे उपाध्यक्षपदासाठी शामकांत सोनवणे यांचे नाव निश्‍चीत करण्यात आले. आज दुपारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत गुलाबराव देवकर आणि अमोल पाटील हे अनुक्रम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार असून त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवकर आणि पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी स्वागत केले आहे.

Protected Content