पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन यांसारख्या विविध पिकांची पेरणी केली होती. मात्र, जून महिन्यापासून सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे सप्टेंबर अखेरपर्यंत या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या प्रतिकूल हवामानामुळे कापसाच्या कैऱ्या सडून दुर्गंधी निर्माण झाली आणि परिणामी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने पारोळा तहसील कार्यालय आणि कृषी विभाग कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. संघटनेने शासन आणि पिक विमा कंपनीकडे खरीप 2024 चा पिक विमा तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
पिक विमा: खरीप पिक विमा 2024 चा लाभ शेतकऱ्यांना त्वरित द्यावा.
बीटी कापूस वाण सुधारणा: बोंड अळीला प्रतिकार करणाऱ्या उन्नत तंत्रज्ञानावर आधारित नवीन जीएम कापूस वाण वापरण्यात यावे.
पंतप्रधान सन्मान निधी: लाभार्थ्यांना तहसील व कृषी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या न लावता त्वरित लाभ मिळावा.
अनुदान: मागील वर्षाचे उर्वरित कापूस आणि सोयाबीन अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
शेती संरक्षण: वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शासनाने अनुदानावर कुंपण योजना प्रभावीपणे राबवावी.
या आंदोलनात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका अध्यक्ष प्रा. बिकनराव पाटील, संघटक गुलाब पाटील, भाऊसाहेब पाटील, गुलाब वाघ, कौतिक चौधरी, निलेश देशमुख, किरण पाटील, सुरेश पाटील, कलश शिंपी, मच्छिंद्र पाटील, गोरख पाटील, विकास पाटील, कृष्णाकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगराज पाटील, रामभाऊ पाटील, नारायण पाटील, संजय केदार, अनिल पाटील, जगदीश पाटील आणि तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाची प्रत तहसीलदार अनिल पाटील आणि कृषी अधिकारी दीपक अहिर यांना सादर करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.